गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल आभार. आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी तुम्ही इथं आला आहात. खात्रीनं तुम्ही सारे आज एक्साइटेड असणार. आयुष्यात असे फारच थोडे दिवस येतात जेव्हा माणूस अस्सल आनंदाचा अनुभव घेतो. कॉलेजचा पहिला दिवस हा त्यातला एक. आज तयार होताना तुम्ही या अनोख्या हरखलेपणाचा अनुभव घेतला असेल. या 'एक्साइटमेंट'लाच मी 'स्पार्क' म्हणतो. हा 'स्पार्क'च झगमगता ठेवण्याबद्दल मी आज बोलणार आहे. थोडं वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर, सदासर्वदा नाही तरी, किमान बहुतेक वेळा आनंदी कसं रहावं, याचं गुपित तुमच्याशी शेअर करणार आहे.
कुठून होते सुरूवात या स्पार्कची? जन्मत:च सोबत घेऊन येतो आपण तो. आज अवघ्या तीन वर्षांच्या असणाऱ्या माझ्या जुळ्या मुलांकडे असे लाखोंनी स्पार्क्स आहेत. स्पायडरमॅनचं एक छोटंसं खेळणं दाखवलं तरी बिछान्यातनं टुणकन् उडी मारतात ते! पार्कमधल्या करकरणाऱ्या झोपाळ्यावर कमालीचे हरखून जातात. बाबाने गोष्ट सांगायला घेतली तर कोण धम्माल! आणि वाढदिवसाची पाटीर्... त्यासाठी तर रोजच्या रोज दिवस मोजले जातात, महिनोन्महिने आधीपासून. फक्त त्या 'एका' दिवसासाठी ज्या दिवशी केक कापायला मिळतो!
तुमच्यासारखे विद्याथीर् भेटतात तेव्हा त्यांच्यात काही प्रमाणात तरी असे 'स्पार्क्स' दिसतात. पण वयाने थोड्या मोठ्या प्रौढांमध्ये मात्र हे 'स्पार्क्स' क्वचितच नजरेस पडतात. म्हणजे, जसजसं वय वाढत जातं तसतसे 'स्पार्क्स' कमी होत जातात तर. ज्यांच्यातले 'स्पार्क्स' खूपच क्षीण झालेले असतात अशी माणसं उदासवाणी, नाकारली गेलेली, ध्येयशून्य आणि कडवट भासतात. 'जब वी मेट'मधली करीना आठवतेय-? पिक्चरच्या र्फस्ट हाफमधली आणि नंतरचीही. 'स्पार्क' गमावून बसल्यानंतर हे असं होतं. कसा सांभाळून ठेवायचा मग हा 'स्पार्क'?
हा स्पार्क म्हणजे एखाद्या दिव्याची ज्योत आहे, असं समजा. म्हणजे पहिल्यांदा या 'स्पार्क'ला सांभाळायला हवं. तो जागता ठेवण्यासाठी सातत्याने इंधन पुरवलं जायला हवं. आणि दुसरं, वादळवाऱ्यापासून त्याचं रक्षण करायला हवं.
काय कराल मग या स्पार्कला सांभाळण्यासाठी? नेहमी स्वत:समोर काहीतरी ध्येयं असू द्या. मेहनतीतून, धडपडीतून, सुधारणा घडवत स्वत:च्या क्षमतेइतपत यश साध्य करणं हा मनुष्यस्वभाव आहे. खरं तर, तेच यश. जे तुम्हाला शक्य आहे ते. म्हणूनच मग यश मोजण्यासाठी बाहेरच्या कुठल्याही फुटपट्ट्या नकोत. अमुक इतका 'कॉस्ट टू कंपनी' पगार, तमकी कार वा फ्लॅट म्हणजे यश नव्हे.
आपल्यापैकी बहुतेक जण मध्यमवगीर्य कुटुंबातले आहेत. त्यामुळेच लौकिक यशाचे टप्पे पार करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं आणि ते योग्यही आहे. आथिर्क मर्यादांमुळे जिथे रोजच्या रोज निवडीवर परिणाम होतो, तिथे आथिर्क स्वातंत्र्य ही मोठी मिळकत वाटणारच. पण तो जगण्याचा हेतू बनता कामा नये. तसं असतं तर श्ाी. अंबानी आजही रोज ऑफिसात हजर नसते झाले. शाहरुख खाननेही घरीच मुक्काम टाकला असता आणि सिनेमा-कार्यक्रमांतून नाचणं बंद केलं असतं. अधिक उत्तम आयफोन बनवण्यासाठी स्टीव्ह जॉब्स झटला नसता. 'पिक्सर'ची काही बिलियन डॉलर्सना विक्री करून टाकल्यावरही त्याला अशा मेहनतीची गरज का वाटावी? या सगळ्यांना रोज कामावर यावंसं का वाटतं? कारण त्यांना त्यांच्या कामातनं 'आनंद' मिळतो. हे कामच त्यांना 'जिवंत' असल्याचं फीलिंग देतं. आज आहोत त्यापेक्षा उद्या अधिक बेहतर असण्यासाठीची धडपड माणसाला आनंद देते. चांगला अभ्यास केला तर तुम्हाला अधिक चांगले मार्क्स मिळतील. लोकांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने मिसळलात तर मुलाखतीत यश मिळेल. प्रॅक्टिस केलीत तर अधिक चांगलं क्रिकेट खेळू शकाल. आपण तेंडुलकर नाही बनू शकत हे मनोमन तुम्हाला ठाऊकअसेल. पण आहे त्यापेक्षा वरचा टप्पा गाठणं तर शक्य होईल. या पुढच्या टप्प्यासाठी आटापिटा करणं महत्त्वाचं.
निसर्गानं निमिर्लेला 'जीन्स'चा एक सरधोपट सेट घेऊन वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीत आपला जन्म होतो. आनंदी राहण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या या निमिर्तीचा स्वीकार करायला हवा आणि त्यातूनच जास्तीत जास्त साध्य करण्याची मनीषा बाळगायला हवी. तुम्ही करताय हे? ध्येयनिश्चिती कराल तर हे शक्य होईल. मी तर म्हणेन की नुसती करिअरसंबंधी वा शैक्षणिक ध्येयं ठरवू नका. तर एक समतोल, यशस्वी आयुष्य वाट्याला यावं यादृष्टीने ध्येयनिश्चिती करा. 'यशस्वी'च्या आधी मी 'समतोल' हा शब्द वापरलाय. समतोल, बॅलेन्सड्. ज्यात तुमचं आरोग्य, नाती, मन:शांती यांचीही काळजी वाहिली जाईल असं आयुष्य.
तुमच्या नात्यात वितुष्ट येईल त्यादिवशी प्रमोशन मिळालं तर त्यात काही अर्थ नसेल. पाठदुखीने पछाडलेले असताना कार चालवण्यात कसली आलीय गंमत! डोक्यावर पन्नास गोष्टींचा ताण असेल तर शॉपिंगची मजा काय कप्पाळ येणार?
लाइफ इज अ टफ रेस, ही एक मॅरेथॉन आहे वगैरे कोट्स तुम्ही वाचले असतील. पण नाही; आजवर मी जे काही आयुष्य पाहिलंय त्यावरून तरी आयुष्य म्हणजे नर्सरी शाळेतल्या त्या शर्यतीसारखं भासतं, जिथे तुम्हाला तोंडातल्या चमच्यातली गोटीही सांभाळायची असते आणि धावायचंही असतं. गोटी पडून गेली तर पहिला नंबर मिळवून काय उपयोग? आयुष्यातही, आरोग्य आणि नाती ही त्या 'गोटी'सारखी असतात. जगण्याचे सारे सूर जुळलेले असतील तरच या सगळ्या खटाटोपाला अर्थ आहे. अन्यथा यश हातात येईल पण 'स्पार्क' विझून गेलेला असेल.
हा स्पार्क सांभाळण्यासंदर्भातली एक अखेरची गोष्ट - आयुष्य सीरियसली घेऊ नका. माझे एक योगा शिक्षक क्लासमध्ये विद्यार्थ्यांना हसवत. एका विद्यार्थ्याने त्यांना विचारलं, 'या जोक्समुळे योगाभ्यासाचा परिणाम कमी तर होणार नाही?' शिक्षक म्हणाले, 'डोन्ट बी सीरियस, बी सिन्सियर.' त्यांच्या या वक्तव्याचा माझ्या कामावर तेव्हापासून परिणाम झालाय. मग ते माझं लिखाण असो, माझी नोकरी, नाती की माझी अन्य कुठली ध्येयं. माझ्या लिखाणाबद्दल माझ्यापर्यंत रोज हजारोंनी मतं पोहोचतात. यात कौतुकाचा वर्षाव असतो तशीच प्रखर टीकाही. हे सारंच मी गांभीर्याने घेतलं तर लिहिणार कसं? किंवा मी जगणार कसा? जीवन इतकंही गांभीर्याने घेऊ नये कारण आपण सगळेच इथं काही काळापुरतेच आहोत. वी आर रिअली टेम्पररी हिअर. लिमिटेड वॅलिडिटी असलेल्या प्रीपेड कार्डसारखे आहोत आपण! लकी असलो तर पुढची आणखी पन्नास वर्षंही जगू. पण पन्नास वर्षं म्हणजे फक्त २५०० वीकएंड्स. मग खरंच इतका त्रागा करण्याची गरज आहे? थोडेफार क्लासेस् बन्क करा, एखाददुसऱ्या इंटरव्ह्यूत घोटाळे करा, प्रेमात पडा. आपण माणसं आहोत, प्रोगॅम्ड डिव्हाइसेस नाही, हे लक्षात असू द्या.
मी तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्या आहेत - वास्तव ध्येयनिश्चिती, जगण्यात समतोल राखणं आणि आयुष्य फार गांभीर्याने न घेणं. यामुळे तुमच्यातल्या 'स्पार्क'ची जपणूक होईल. मात्र, आयुष्यात चार वादळंही असतील जी या स्पार्कला पुरतं विझवून टाकू शकतील. अपेक्षाभंग, निराशा, अन्याय आणि एकाकीपणा - ही ती वादळं. त्यांच्यापासून या ज्योतीचं संरक्षण करण्याची गरज आहे.
प्रयत्न करूनही जेव्हा अपेक्षित यश मिळणार नाही तेव्हा अपेक्षाभंग वाट्याला येईल. योजना आखल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर, किंवा अपयश आलं तरीही. अपयश हाताळणं ही महाकठीण गोष्ट. पण ज्यांना ते जमतं, ते अधिक खंबीर होऊनच बाहेर पडतात. या अपयशातून मी काय शिकलो? हा प्रश्न स्वत:ला विचारण्याची गरज असते. खूप वाईट वाटेल. सारं सोडून द्यावंसं वाटेल. मलाही वाटलं होतं; माझ्या पहिल्यावहिल्या पुस्तकाकडे तब्बल नऊ प्रकाशकांनी पाठ फिरवली तेव्हा. कमी मार्क्स मिळाले की आयआयटीतील काही मुलं आत्महत्या करतात. किती मुर्खपणाचं काम आहे हे? पण अपयशातून हे असं टोकाचं दु:ख होऊ शकतं. हेच आयुष्य आहे. आव्हानांना नेहमीच पादाक्रांत करता आलं असतं तर त्यांना आपण 'आव्हानं' का म्हटलं असतं? एखाद्या गोष्टीत तुम्ही पुन्हा पुन्हा अपयशी होत असाल तर कृपया हे लक्षात घ्या की, तुम्ही तुमच्या क्षमतेची मर्यादा गाठलेली आहे. तिथवर पोहोचणं हेच तुमचं ध्येय होतं.
निराशा आणि अपेक्षाभंग हातात हात घालूनच येतात. हे दुसरं वादळ. तुम्ही कधी अनुभवलीय निराशा? इट हॅपन्स व्हेन थिंग्ज आर स्टक. काहीच मनासारखं घडत नाही तेव्हा निराश व्हायला होतं. भारतासारख्या देशात तर हे वरचेवर होतं. कधी कधी इतका वेळ लागतो की आपल्यालाच वाटू लागतं की मी योग्य गोष्ट निवडली होती वा नाही. पुस्तकांनंतर मी बॉलीवुडसाठी सिनेमे लिहिण्याचं ठरवलं कारण तिथे लेखकांची गरज आहे असं मला वाटलं होतं. मी खूप नशीबवान आहे असं म्हटलं जातं. पण पहिलावहिला सिनेमा रीलीजच्या जवळपास पोचण्यासाठी मला पाच वर्षं थांबावं लागलंय.
निराशेमुळे अवघा उत्साह मावळून जातो आणि सुरूवातीची ऊर्जा नकारात्मकतेत पालटते. कडवटपणा येतो. या साऱ्याला मी कसं तोंड दिलं? वेळ का लागतोय याचा वास्तववादी आढावा घेणं इथं आवश्यक असतं. सिनेमे 'बघून' चटकन होत असले तरी बनवण्यासाठी नको इतका वेळ लागतो! कधी कधी एखादी गोष्ट पूर्ण होण्यापेक्षा ती पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आनंद शोधणं आवश्यक असतं. उदा. किमानपक्षी मी स्क्रिप्टस् कशी लिहावीत हे शिकत होतो. जोडीला माझा दुसरा प्लान तयार होता - तिसरं पुस्तक लिहिण्याचा! आणि कधी कधी मित्रांबरोबर वेळ घालवणं, खाणं, प्रवास करणं यातही वेळ छानच जातो की. काहीच 'गांभीर्या'ने घ्यायचं नसतं. तुम्ही नको इतकं सिरीयसली घेतलंत, हेच तुमच्या निराशेतून दिसून येतं.
अन्याय. याच्याशी झगडणं सर्वात कठीण. पण आपल्या देशात सारंकाही असंच चालतं. कनेक्शन्स असलेली, बड्या बापांची, चिकण्या चेहऱ्यांची पोरं... त्यांना यश मिळवणं सोपं जातं. फक्त बॉलीवुडमध्ये नव्हे तर सगळीकडेच. नशिबाचा भागही असतोच. आपल्या देशात संधीची केवढी कमतरता आहे. सगळं जमून यायला कितीतरी ग्रहतारे जुळून यावे लागतात. मेरिट आणि मेहनतीचा शॉर्ट टर्ममधल्या यशाशी नेहमीच संबंध असतो असं नाही. पण लाँग टर्ममध्ये मात्र प्रमाण बरंच 'बरं' आहे! अखेरीस सारं मनासारखं घडतं! पण लक्षात ठेवा, काही लोक तुमच्यापेक्षा थोडे अधिक नशीबवान असतील. खरं तर, तुम्हालाही कॉलेजात येण्याची संधी मिळतेय आणि इंग्रजीतलं हे भाषण समजतंय म्हणजे भारतीय स्टँडर्डनुसार तुम्ही बरेच 'नशीबवान' म्हणायचे! आपल्या हाती जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगूया आणि जे नाही ते स्वीकारण्याची क्षमता मिळवूया. मला माझ्या वाचकांकडून इतकं प्रेम मिळतंय की इतर लेखक कल्पनाही करू शकणार नाहीत. पण वाड्मयीन कौतुक माझ्या वाट्याला येत नाही. इट्स ओके. एवढंच म्हणायचंय की, अन्यायामुळे तुमच्यातील स्पार्क खाक होऊ देऊ नका.
तुमच्यातील स्पार्कचा बळी घेऊ शकेल असा अखेरचा मुद्दा. एकाकीपणा. जसजसे तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या लक्षात येत जाईल की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. लहानपणी सगळ्याच मुलांना आइस्क्रीम आणि स्पाइडरमॅन हवा असतो. पुढे कॉलेजात जाता तेव्हाही तुम्ही बरेचसे तुमच्या मित्रमंडळींसारखे असता. पण आणखी दहा वर्षं गेली की तुमचं वेगळेपण तुम्हाला ठळकपणाने जाणवू लागतं. तुम्हाला काय हवंय, तुमच्या निष्ठा, विश्वास कशाशी निगडित आहेत, तुम्ही कशाबद्दल संवेदनशील आहात या सगळ्या गोष्टींसंदर्भात तुम्ही तुमच्या निकटवतीर्यांपेक्षाही वेगळे असू शकता. या वेगळेपणामुळे मग संघर्ष होऊ शकतो. कारण इतरांची ध्येयं तुमच्याशी जुळत नाहीत. मग तुम्ही काही गोष्टींना सोडचिठी देता. कॉलेजमध्ये बास्केटबॉल चॅम्पियन असलेले बहुतेक जण दुसरं मूल होईतो बास्केटबॉलला रामराम ठोकतात. कोणेकाळी हाच बास्केटबॉल त्यांचं सर्वस्व होतं. पण कुटुंबासाठी हे पाऊल उचललं जातं. आणि तिथेच तो 'स्पार्क' विझण्याची सुरूवात होते. ही अशी तडजोड कदापिही करू नका.
अपेक्षाभंग, निराशा, अन्याय आणि एकाकीपणा. तुम्ही त्यांना टाळू शकत नाही कारण पावसाळा जितका नियमितपणे येतो, तितक्याच नियमितपणानं ही संकटं आयुष्याच्या वाटेवर अधूनमधून भेटतच राहतात. त्यापासून आपला आतला 'स्पार्क' वाचवण्यासाठी 'रेनकोट' हाताशी ठेवणं एवढी खबरदारी घेणं तुमच्या हातात असतं.
आयुष्यातल्या या सर्वाधिक मजेशीर कालखंडात मी तुमचं स्वागत करतो. तुमच्या डोळ्यांत आज जी चमक दिसतेय ती दहा वर्षांनंतरही कायम राहील अशी मला आशा आहे. निव्वळ तुम्हीच नाही तर अवघा भारतच हा 'स्पार्क' टिकवून ठेवो, अशी माझी इच्छा आहे. कारण यापूवीर् कधी नव्हे इतकी 'आता' आपल्याला त्याची गरज आहे. 'आय कम फ्रॉम द लँड ऑफ अ बिलियन स्पार्क्स' असं आपल्याला सांगता आलं तर काय बहार येईल!
धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा